| महाड | प्रतिनिधी |
स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव महाडमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संस्थांनी विविध ठिकाणी ध्वजारोहण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
महाड शहरात मुख्य ध्वजारोहण महाड तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते पार पडले, यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांनी देखील याठिकाणी उपस्थिती दाखवून ध्वजाला सलामी दिली. महाड प्रांत कार्यालय, महाड नगर पालिका, शहर पोलीस, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड न्यायालय, आदी ठिकाणी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. गेली तीन दिवस शहरातील विविध शासकीय कार्यालयांवर रोषणाई करण्यात आली होती.
गेल्या तीन दिवसापासून महाड नगर पालिकेने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील चवदारतळे याठीकाणी उभारलेल्या ध्वजाचे ध्वजारोहण महाडचे आमदार भरत गोगावले, खा. सुनील तटकरे, हिम्मतराव बावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. पालिकेच्या वतीने शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती. किल्ले रायगडावर देखील नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण केले जाते. यावेळी रायगड प्राधिकरणचे युवराज संभाजीराजे हे देखील उपस्थित राहिले होते.