नवगाव येथील दखणे परिवार शेकापक्षात
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तालुक्यातील नवेदर नवगाव येथील दखणे परिवाराच्या सर्व सदस्यांनी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. नवगावमध्ये दखणे परिवार मोठा असल्याने ऐन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतच हा पक्षप्रवेश झाल्याने बंडखोर दळवी गटाला खिंडार पडले आहे.
तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु असून या पार्श्वभुमीवर नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच विकास झाला आहे. गावातील प्रत्येक प्रश्नासाठी आ. जयंत पाटील यांच्यासह शेकाप तत्पर असतो. त्यामुळे गावाचा विकास शेकापच करु शकतो असा विश्वास असल्याने गावात मोठा परिवार असलेल्या दखणे परिवाराच्या सर्व सदस्यांनी शेकापक्षात प्रवेश केला. बंडखोर आमदार दळवी यांच्या मनमानी कारभार आणि सुडाच्या राजकारणाला कंटाळलेल्या दखणे परिवाराने आ. जयंत पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शेकापक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले. दत्ताराम दखणे, सुरेंद्र दखणे, संजीवन दखणे यांच्यासह सर्व दखणे परिवार यावेळी उपस्थित होता. आ. जयंत पाटील यांनी सर्वांना पुष्पगुच्छ आणि शेकापचे स्कार्प देत पक्षात स्वागत केले.
यावेळी अलिबाग पंचायत समितीचे सभापती तुकाराम लडगे, वरसोली ग्रामपंचायत समितीचे सदस्य सुरेश घरत, नवगाव कोळी समाज गावपाटील, माजी सरपंच फिडी कटोर, नवगाव येथील मच्छिमार सोसायटीचे चेअरमन दत्ताराम कोळी, माजी चेअरमन श्रीरंग थळकर, सासवणे मच्छिमार सोसायटीचे चेअरमन एकनाथ नाखवा आदी उपस्थित होते.