सिडको पथकांडून दोन चालकांविरोधात तक्रार, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई मेट्रोच्या कामादरम्यान निर्माण होणार्या डेब्रिजची विल्हेवाट तळोजा परिसरात टाकणार्या दोन डंपर चालकाविरोधात सिडकोच्या पथकाने तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सिडकोच्या पथकाने दिलेल्या तक्रारी नुसार नागरिकांच्या जीवितांस व आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास तळोजा पोलीस करीत आहेत. संतोष कुमार मेहतो, वय-32 वर्षे, बबलु मुरली पंडीत, वय-22 वर्षे असे या दोन डंपर चालकांचे नावे आहेत.
पनवेल – मुंब्रा महामार्ग क्रमांक 4 असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे. या मार्गावरून बाहेरच्या राज्यातून अवजड वाहने ये-जा करतात. कळंबोली येथील स्टील मार्केट, जे.एन.पी.टी. तसेच पुणे येथे जाणारी वाहने सुध्दा याच महामार्गाचा वापर करतात. त्याचबरोबर प्लास्टिक, कचरा, रस्त्यावर खड्डे, तुंबलेल्या मलनिःसारण वाहिन्या, अपुरा पाणीपुरवठा यासारखे अनेक प्रश्नांनी या महामार्गाला घेरले आहेच. त्याचबरोबर मोकळया भूखंडावर मोठया प्रमाणात डेब्रीज राजरोसपणे टाकण्यात येत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला आहे.
त्याशिवाय वसाहतींचे सौदर्य हरपत चालले आहे. याबाबत सिडको प्रशासनाकडून सिडको हद्दीमध्ये ड्रेब्रिज टाकणार्याविरोधात कारवाई करण्याकरिता सिडकोच्या ठिकठिकाणी पथकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये खारघर परिसरात समीर गोडबोले, सहाय्यक कार्यकारी अभियंता यांची व सुरक्षा सहाय्यक आर.के. वेदांते, बंडा पाटील, सुरक्षारक्षक सागर गव्हाणे व शरद पाटील यांची खारघर, तळोजा परिसरात भरारी पथक म्हणून नियुक्ती केली आहे.
यावेळी मध्य रात्रीच्यावेळी हे भरारी पथक गस्त घालीत असताना पनवेल-मुंब्रा महामार्गालगत असलेल्या शालिमार हॉटेलच्या समोरील मुख्य महामार्गाच्या बाजूला दोन डंपरमधील डेब्रिज रस्त्यावर टाकताना आढळले. यावेळी या पथकाने त्यांना हटकले असता मुंबई, वरळी येथील मेट्रो वार्डामधील हे डेब्रिज असल्याच्या त्या दोन चालकांनी सांगितले. त्यानुसार सिडकोच्या पथकांनी चालकांच्या विरोधात तक्रार दिली असून तळोजा पोलिसांनी धोकादायक असलेला डेब्रिज सार्वजनिक ठिकाणी टाकून नागरिकांच्या जीवितांस व आरोग्यास धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.