। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत.
महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं. त्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ,” असे धमकीवजा पत्र सीपीआय (माओवादी) या नावाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहचल्याची माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीत काम सुरू केल्यापासून आमचा पैसा बंद झाला असेही या पत्रात नमूद होते व याचे चोख उत्तर दिले जाईल असे म्हणत शिंदें व त्यांच्या परिवाराला याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल,” अशी धमकी पत्रात देण्यात आली होती.