। नवीन पनवेल । वार्ताहर ।
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील बंद असलेल्या पथदिव्यांमुळे अंधार पसरला आहे. या अंधाराचा फायदा घेऊन तळोजा अग्निशमन दलाच्या समोरील रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. मात्र महिलेने केलेल्या विरोधामुळे सोनसाखळी चोरांचा डाव फसला.
वलप येथील प्रियंका बागल कामोठे एमजीएम रुग्णालयातून नातेवाईकांची भेट घेऊन स्कूटरवरून घरी जात होत्या. त्याचवेळी रात्री साडेबाराच्या सुमारास तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर अग्निशमन विभागाच्या समोर दुचाकीवर आलेल्या तीन युवकांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीमध्ये प्रियंका यांच्या मानेला झटका बसल्यामुळे गाडीचा तोल जाऊन रस्त्यावर पडल्या, पण त्यांनी केलेल्या विरोधामुळे सोनसाखळी चोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी महिलेने तळोजा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बळीराम घंटे यांना माहिती दिली. पोलिसांनी सीसी टीव्हीच्या आधारे सोनसाखळी चोरांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, महिलेच्या प्रसंगावधानाने सोनसाखळी चोरांचा डाव जरी फसला असला तरी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणचे बंद असलेल्या पथदिव्यांमुळे चोरीचे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.