| महाड । वार्ताहर ।
महाड शहर पोलिसांनी मंगळवारी (ता. 2) संध्याकाळी 8 च्या सुमारास जुने पोस्ट परिसरातील एका दुकानावर छापा टाकला. या दुकानातून 3 हजार 212 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दुकान मालक आणि विक्री करणार्या कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड जुने पोस्ट परिसरात ओमसाई पान कॉर्नर दुकान आहे. या ठिकाणी गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती महाड शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दुकानावर छापा टाकत आरएमडी पान मसाला, विमल पान मसाला आणि मानवी जीवनाला अपायकारक; असणारा तसेच महाराष्ट्र सरकारने विक्रीला बंदी केलेला तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण 3 हजार 212 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी दुकान मालक राजेश जयवंत थरवळ आणि दुकानातील मालाची विक्री करणारा कामगार सुनील भामरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेखा जगदाळे करत आहेत. काही महिन्यांपासून महाड तालुक्यातील अनेक ठिकाणांहून पोलिसांनी गुटखा जप्त केला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही गुटख्याचा व्यवसाय सुरूच असल्याचे चित्र महाडमध्ये दिसत आहे.




