। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील महसूल विभागातील तीन कर्मचार्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ठाणे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून तालुक्यातील पिंपरवाडा येथे जमिनीचे भूखंड नावावर करण्यासाठी लाच मागितली होती आणि त्यापैकी 60 हजाराची लाच घेतांना महसूल मंडळ अधिकारी, तलाठी आणि कारकून अशा तिघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
पिंपरवाडा येथे एलिजंट ही जमीन विकसित करणारी भूखंड विकसित करणारी कंपनी असून त्या कंपनीकडून मुंबई येथील व्यक्तीने भूखंड विकत घेतला आहे.त्या भूखंडाची नोंद महसूल विभागात करण्यासाठी तेथील महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी संबंधीत भूखंड मालक यांच्याकडे लाच मागितली होती.त्याबद्दल संबंधित भूखंड मालकाने ठाणे येथे लाचलूचपत विभागाकडे धाव घेतली होती.त्यानंतर आज 2 नोव्हेंबर रोजी ठाणे येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला होता.
मुंबई येथील भूखंड मालक यांनी त्यासाठी आपण महसूल विभागाचे कर्मचारी यांना आंबिवली पिंपरवाडा येथे बोलावून घेतले.पैसे मिळणार म्हणून महसूल विभाग कशेळे येथील मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी, तलाठी शीतल पाटील आणि तलाठी कार्यालयातील कारकून वामन खंडागळे हे तेथे पोहचले. त्यावेळी विकत घेतलेल्या भूखंडाची नोंद करण्यासाठी लाच म्हणून मागितलेले एक लाख रुपये यांच्या मधून तडजोड झालेली 60 हजारांची क्कम मंडळ अधिकारी तलाठी आणि कारकून यांनी स्वतःच्या हातात स्वीकारली.त्याचवेळी ठाणे लाचलूचपत विभागाचे पोलिस निरीक्षक आणि त्यांची टीम तेथे पोहोचली आणि त्या सर्वांना रंगेहाथ पकडले.
यापूर्वी देखील यातील एका कर्मचार्यावर लाचलूचपत विभागाने कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा सरकारी अधिकारी कर्मचारी लाच घेतांना पकडले जाण्याने शासकीय यंत्रणा हादरली आहे.