धोकादायक बांधकाम दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष
| पनवेल | वार्ताहर |
इतिहासाचा साक्षीदार असलेल्या कर्नाळा किल्यावर काही प्रमाणात बांधकाम धोकादायक झाल्याने तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, वनविभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. परिणामी, किल्ल्यावर जाण्यास अद्यापही मनाई आहे. या कारणाने गिर्यारोहक, पर्यटक आणि इतिहासप्रेमींमध्ये निराशाचे वातावरण आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पनवेलपासून 12 कि.मी. अंतरावर कर्नाळा अभयारण्य परिसरात उंचावर 1248 साली कर्नाळा किल्ला बांधण्यात आला. एकंदरीत ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय जुना आणि महत्त्वाचा असलेला हा अनमोल ठेवा भौगलिकदृष्ट्या त्या काळात उपयुक्त होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कर्नाळ्यावरून मुरुड जंजिरा, अलिबाग, रायगड, घाटमाथा, मुंबई या सर्व गोष्टी पाहता येत होत्या. आणि आजही त्यावर गेल्यावर दिसतात. पनवेलला मोठी बाजारपेठ व मिठागरे, बंदर असल्याने टेहळणीकरिता कर्नाळा किल्ला अतिशय महत्त्वाचा समजला जात होता. याच परिसरात घनदाट झाडे आणि पक्ष्यांच्या सान्निध्यात त्याचबरोबर कर्नाळा हा इतिहासाची साक्ष देणारा उंचावर किल्ला असल्याने अनेक पर्यटक, गिर्यारोहक व इतिहासप्रेमी या ठिकाणी येतात. मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणाहून अनेकजण सुट्टी किंवा वेळ मिळेल तेव्हा कर्नाळ्यात येतात.
दरम्यान, कर्नाळा किल्ल्यावरील एका ठिकाणी बांधकाम नादुरुस्त अवस्थेत आहे. नुकताच उपवनसंरक्षक यांनी सहाय्यक वनसंरक्षकांबरोबर कर्नाळा अभयारण्य परिसराचा दौरा केला. तेव्हा पर्यटकांच्या दृष्टिकोनातून किल्ल्यावरील बांधकाम धोकादायक असल्याने येथे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, हे बांधकाम त्वरित दुरुस्त करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले होते. मात्र, याबाबत कोणतीही उपाययोजना किंवा हालचाल न झाल्याने कर्नाळा किल्ल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. इतिहासाचा साक्षीदार सध्या एकांत वासात असल्याचे दिसून येत आहे.
उपायोजना करून किल्ल्यावर प्रवेश द्या
कर्नाळा अभयारण्य परिसरात प्रवेश शुल्क घेण्यात येते. परंतु, किल्ल्यावर जाण्यास मनाई असल्याने अर्धा तासातच पर्यटकांना परतावे लागते. परिणामी, त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटतो. या सर्व पार्श्वभूमीवर वनविभागाने त्वरित उपाययोजना करून कर्नाळा किल्ल्यावर प्रवेश द्यावा, अशी मागणी ग्राम परिस्थिती विकास समिती कल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.