विदितचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
रशिया | वृत्तसंस्था |
जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सोमवारी अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवर 1.5-0.5 अशा फरकाने विजय मिळवत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तब्बल 19 वर्षांनी प्रथमच एखाद्या भारतीय बुद्धिबळपटूने अशी कामगिरी केली आहे.
पाचव्या फेरीतील दुसर्या डावामध्ये विदितने पांढर्या मोहर्यांनिशी खेळताना वासिफवर 38 चालींमध्ये विजय मिळवला. या दोघांमधील पहिला गेम बरोबरीत सुटला होता. यापूर्वी 2000 आणि 2002मध्ये विश्वनाथन आनंदने विश्वचषक जेतेपद मिळवले होते. आता पुढील फेरीत 26 वर्षीय विदितसमोर रशियाचा अलेक्झांडर ग्रिसचूक आणि पोलंडचा जॅन क्रेझीस्टोफ यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.
दरम्यान, अन्य लढतीत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला रशियाच्या आंद्रे इस्पिनेकोने दुसर्या गेममध्ये बरोबरीत रोखल्यामुळे मंगळवारी टायब्रेकमध्ये त्यांच्यापैकी कोण उपांत्यपूर्व फेरी गाठणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.