। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील स्थानिक व प्रकल्पग्रस्त रहिवाशांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे. तसेच कोळी बांधवांना न्याय मिळावा या उद्देशाने उरण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जेएनपीए बंदराच्या अंतर्गत येणार्या (चौथ्या पोर्ट) गेटवर धडक देत गुरुवारी (दि.10) गेट बंद आंदोलन छेडले होते. मनसेच्या या आंदोलनामुळे रस्त्यावर तीन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
मनसे नेते अविनाश जाधव, जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी घोषणाबाजी करुन गेट बंद करण्याचा निर्णय घेतला. न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी आपल्या पोलीस सहकार्याच्या उपस्थित आंदोलनकर्त्याना रोखून धरले होते जाधव यांच्या हस्ते व्यवस्थापन अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शेखर जाधव, अमोल तांबे, सत्यवान भगत,अल्पेश कडू, प्रविण दळवी,दीपक कांबळी, योगेश चिले, राकेश भोईर,मंगेश वाजेकर, रितेश पाटील,बबन ठाकूर,अनिल गावंड, दीपक सुतार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.