| महाड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कारमेल कॉन्व्हेट स्कूल खोपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने रायगड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत को.ए.सो.चा वेदांत कुंदन रिंगे याने सुवर्णपदक पटकाविले आहे.
वेदांत रिंग हा को.ए.सो.चे विनायक हरी परांजपे विद्यामंदिर महाड या विद्यालयाचा विद्यार्थी असून, तो इयत्ता आठवीत शिकत आहे. त्याने 14 वर्ष वयोगटात आणि 62 किलो वजनी गटात जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सर्वांना चित देऊन सुवर्णपदक प्राप्त केले आहे. वेदांत रिंगे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटी अलिबागचे संचालक दिलीप पार्टे तसेच शाळा समितीचे चेअरमन मिलिंद टिपणीस, मुख्याध्यापिका स्वराली शेठ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. वेदांतला विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक दयानंद जैतू यांचे प्रशिक्षण, तसेच क्रीडा शिक्षक ज्ञानदेव साळवे यांनी मार्गदर्शन केले. या सुवर्णपदकाबद्दल वेदांत याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. तसेच पुढील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.