मृतदेहाच्या अंगावर लोखंडी शस्त्राने हल्ला
। नेरळ । वार्ताहार ।
कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाचे मालक हरीश रजपूत हे आपल्या दुचाकीवरून नेरळ रेल्वे स्टेशन कडे येत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला असून या अपघातात निधन झालेले रजपूत यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने नेरळ पोलिसांकडून तपास सुरू असून अलिबाग येथून डॉग स्कॉड घटनास्थळी पोहचले आहे. दरम्यान, अपघाती निधन झालेले रजपूत यांच्या अपघात स्थळी त्यांचा मोबाईल उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे आणि त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
डोंबिवली येथील हरेश रजपूत यांनी सहा वर्षापूर्वी कशेळे येथील बाजारपेठ भागातील राईस मिलच्या बाजूला असलेल्या भात गिरणी सोसायटीच्या गाळ्यामध्ये सोन्या चांदीचे दुकान सुरू कडून ज्वेलर्स व्यवसाय सुरू केला.त्यात मुख्य गावात त्यांचे दुकान असल्याने आणि त्यांचे कुटुंबीय देखील कशेळे ग्रामस्थ यांचे जवळचे बनले होते. त्यांच्या राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाचा व्यवसाय सकाळी दहाचे आठ असा असल्याने ते दररोज कशेळे येथून नेरळ स्टेशन वर येवून पुढे लोकल पकडून डोंबिवली येथे घरी पोहचत. काही महिन्यांपूर्वी रजपूत हे ठाकुर्ली येथील नवीन ठिकाणी राहायला गेले होते आणि तेथून दररोज नेरळ असा प्रवास करीत कशेळे येथे जात. नेरळ ते कशेळे हा प्रवास ते दररोज आपल्या एम एच 05 एजी 3849 या दुचाकीवरून असे.नेरळ येथे पार्किंग मध्ये दुचाकी उभी करून घरी जाण्याचा त्यांचा दिनक्रम होता.
दुकान बंद करून नेहमीप्रमाणे कशेळे येथून हरीश रजपूत हे नेरळ येथे येण्यासाठी निघाले होते. मात्र आज 4 डिसेंबर रोजी मुंबई येथे मालाची खरेदी करण्यासाठी जायचे असल्याने रजपूत हे 3 डिसेंबर रोजी लवकर दुकान बंद करून नेरळ कडे निघाले होते. सायंकाळी सव्वा सात वाजता रजपूत हे आपल्या दुचाकीवरून निघाले मात्र आपल्या घरी नेहमीच्या वेळी पोहचले नाहीत. लवकर घरी येणार असे सकाळी निघताना सांगणारे हरीश रजपूत हे ठाकुर्ली येथील घरी पोहचले नसल्याने रजपूत कुटुंबीयांनी कशेळे येथे आपल्या ओळखीच्या लोकांना फोन करून चौकशी केली असता दुकान बंद असल्याची माहिती देण्यात आली. त्यात हरीश रजपूत यांचा मोबाइल फोन देखील 3 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजल्यापासून बंद होता. शेवटी रात्री साडे दहा पर्यंत वाट बघून रजपूत यांच्या घराच्या लोकांनी नेरळ आणि कर्जत पोलीस ठाणे येथे संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली मात्र काही माहिती मिळत नसल्याने रजपूत यांच्या दोन्ही कन्या थेट नेरळ पोलीस ठाण्यात मध्यरात्री नंतर पोहचल्या.त्यावेळी रात्रपाळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी कर्जत पोलिसांना कळवून त्यांना कर्जत ते मुरबाड रस्त्यावर कशेळे पर्यंत रस्त्यावर कोणता अपघात झाला आहे काय? याची पाहणी करण्यास सूचित करण्यात आले तर नेरळ पोलीस नेरळ येथून भिमाशंकर रस्त्यावर कशेळे कडे जाणाऱ्या भागात पाहणी करण्यासाठी प्रवास सुरू केला होता.
शेवटी उल्हास नदीवरील वाकस पुलाच्या अलिकडे नेरळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर हरीश रजपूत यांची दुचाकी अपघात ग्रस्त अवस्थेत आढळून आली. त्या ठिकाणी रस्त्याच्या खाली दहा फूट खोल शेतामध्ये हरीश रजपूत यांचा पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास दिसून आला.त्याबाबत तेथे हजर असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांना त्या मृतदेहाची कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक तेंडुलकर यांनी पोलीस उप अधीक्षक विजय लगारे यांना कळविल्यानंतर या दोन्ही अधिकारी यांच्या उपस्थितीत सहा वाजण्यापूर्वी मृतदेह सरकारी दवाखान्यात पाठवून देण्यात आला. मात्र घटनास्थळी मृतदेहाच्या आसपास असलेली परिस्थिती लक्षात घेवून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलीस उप अधीक्षक लगारे यांनी जिल्हा पोलिस मुख्यालय येथून डॉग स्कॉड पाठवून देण्यास सांगितले आहे. हरीश रजपूत यांच्या डोक्याला मार लागून अपघात स्थळी त्यांच्या पायातील बूट आढळून आले असून त्यांचा मोबाईल तसेच पैसे यापैकी काहीही आढलून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला असून दुपारी एक वाजता अलिबाग येथून आलेल्या श्र्वानाने अपघात ग्रस्त भागाची पाहणी केली.
मृतदेहाच्या शरीरात लोखंडी हत्याराचे वार
हरीश रजपूत हे आज 4 डिसेंबर रोजी मुंबई येथे मालाची खरेदी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीला असावी आणि त्यानेच त्यांचा काटा काढला असावा असा संशय व्यक्त होत आहे.त्यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता गालावर आणि पोटात लोखंडी हत्याराने वार केले असल्याचे दिसून येत असून अपघात घडवून आणल्यानंतर त्यांना ठार मारून आरोपी पसार झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.घटना स्थळी मृत हरीश रजपूत यांच्या पायातील बुट तसेच पडून होते आणि त्यामुळे श्वान पथक त्या माध्यमातून माग काढतो काय? याकडे पोलिसांचे तपास कार्य पुढे सरकणार आहे.
मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात
हरीश रजपूत या राजस्थानी व्यापाऱ्याचे अपघाती निधन झाल्यानंतर कर्जत उपजिल्हा रूग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले.त्यात मानेवर आणि पोटावर जखमा असल्याने घातपाताचा अंदाज खरा ठरत आहे.मात्र दुपारी दीड वाजता शव विच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह रजपूत कुटुंबीयांकडे देण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी राजस्थान येथील आपल्या गावाकडे प्रवास सुरू केला असून राजस्थान येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक घटना स्थळी
दुपारी जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे हे नेरळ येथे पोहचले आणि त्यांनी तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली.त्यावेळी कर्जत पोलीस उप अधीक्षक विजय लगारे,नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र तेंडुलकर,कर्जत पोलीस निरीक्षक के डी कोल्हे,माथेरान पोलीस ठाणे प्रभारी शेखर लव्हे आणि पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली. दरम्यान,या घटनेची नोंद सकाळी नेरळ पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरी वर अपघाती मृत्यू अशी करण्यात आली आहे.