अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर शिग्रोबा मंदिराच्या विरुद्ध दिशेच्या खिंडीत उतारावर मंगळवारी (दि.20) रात्री 8.00 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. या गाडीत 6 पुरुष, 7 महिला तर 9 लहान मुले असे एकूण 22 जण प्रवास करीत होते. त्यापैकी 12 जण या अपघातात जखमी झाले आहेत. सर्वजण डोंबिवली येथील असून यातील एकजण खोपोलीतील आहे.
छोटा हत्ती टेम्पो नंबर MH-05-EL-3891 त्या ठिकाणी आली असता त्यावरील चालक रणजित गुप्ता (रा. डोंबिवली) याचे नियंत्रण सुटून टेम्पो रोडच्या बाजूला उलटला. अपघातस्थळी आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, आरटीओचे अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीसाठी प्रयत्न करत होते.
सर्व जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल केले असून त्यातील एक महिला व पुरुष यांना रुग्णालय कामोठे येथे शिफ्ट केले आहे. अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले आणि बाधित वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.