| नेरळ | प्रतिनिधी |
वर्षाखेरचा समारोप आणि नववर्षाचे स्वागत असे औचित्य साधत कर्जतच्या बहुतांशी फार्म हाऊसेसवर गेल्या दोन दिवसांपासून मौज, मजा, मस्ती आणि गाणी असा आनंदमय सोहळा सर्वत्र पहावयास मिळत आहे. विकेन्डबरोबरच कुटुंबासह मित्रमैत्रिणींबरोबर एन्जॉय करण्यासाठी हजारो पर्यटक कर्जत, नेरळ परिसरात दाखल झालेले आहेत.
कर्जत तालुक्यात 20 हजार फार्म हाऊस असून या पर्यटनाकडे झुकलेल्या तालुक्यातील किमान दोन हजार लहान-मोठे रिसॉर्ट आणि ऍग्रो टुरिझम सेंटर उभी राहिली आहेत. त्या सर्व ठिकाणी थर्टी फर्स्टचा सोहळा अमाप उत्साहात साजरा झाला. पर्यटक पाहुणे यांची देखील गर्दी सर्वच फार्म हाऊस आणि रिसॉर्ट या ठिकाणी आहे. दरम्यान, कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये आणि कोणत्याही प्रकारचे अवैद्य प्रकार घडू नये यासाठी स्वतः जिल्ह्याचे अप्पर अधीक्षक यांनी फार्म हाऊसेस वर लक्ष केंद्रित केले होते. सुदैवाने किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मागील दोन दिवसांपासून कर्जत तालुक्यातील रस्ते पर्यटकांच्या वाहनांनाही रात्रदिवस भरले आहेत. गतवर्षी भालिवडी येथील रिसॉर्टवर अनुचित प्रकार घडला होता आणि त्यामुळे यावर्षी पोलिसांनी आणखी कडक भूमिका घेतली आहे. जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी कर्जत येथे येऊन सर्व भागाची पाहणी करून थर्टी फस्ट शांततेत पार पडला पाहिजे यासाठी सुरक्षा यंत्रणेची माहिती घेतली. रस्त्यांवर आणि जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त दिसत असून मद्य सोबत घेऊन जाणार्या व्यक्तीला मद्य पिण्याचे लायसन्स आहे किंवा नाही याची खात्री केली जात आहे. तर चोरीने मद्य घेऊन जाणार्यांवर कारवाई केली जात आहे. सर्व ठिकाणी थर्टी फर्स्ट साजरा करावा पण कायद्याची चौकटीत अशा सूचना पोलिसांनी सर्व हॉटेल मालक,फार्महाऊस मालक आणि मद्य विक्रेते तसेच हॉटेल व्यवसायिक यांनी दिले आहेत.
सेलिब्रेशन पार्टी यांची धूम…
कर्जत तालुक्यात मोठ्या रिसॉर्ट मध्ये थर्टी फस्ट साठी दोन महिने आधीच बुकिंग खाली असून त्या प्रमाणे रिसॉर्ट मालक यांनी देखील पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या पार्ट्यांचे आयोजन केले आहे. त्यात लाईव्ह गाण्यांचा कार्यक्रम, जादूचे प्रयोग, डीजे असे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.