| रसायनी । वार्ताहर ।
कारखानदारीमुळे पाताळगंगा नदी प्रदूषित झाली आहे, ईटीपी आणि औद्योगिक क्षेत्रातील सीईटीपी केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाताळगंगा नदीत स्फोट घडवून मासेमारी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता मच्छीमार तसेच नदीलगतच्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पूर्वी मासेमारी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या वापर केला जायचा. त्यामुळे जलचर प्राण्यांचे नुकसान होत नव्हते, शिवाय नदीपात्र प्रदूषितही होत नव्हते; मात्र गेल्या काही दिवसांपासून भरपूर मासे मिळावेत, यासाठी नदीत स्फोट घडवले जात आहेत. या स्फोटावर बंदी घालावी, अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पाताळगंगा नदी रसायनीतील खालापूर आणि पनवेल तालुक्यातील गावांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. नदीच्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी, शेतीसाठी केला जातो; तर नदीकाठच्या आदिवासी वाडीतील ग्रामस्थ रोजंदारीची कामे न मिळाल्यास मासेमारी करीत उदरनिर्वाह करतात.
आधी पागेर टाकणे, गळ टाकणे, जाळा टाकणे, पाणी उपसणे अशा माध्यमातून मासेमारी केली जायची. या पद्धतीमुळे नदीतील इतर जलचरांना नुकसान होत नव्हते. शिवाय पाणीही दूषित होत नव्हते; मात्र कमी वेळात जास्त मासे मिळावेत, याकरिता गेल्या काही दिवसांपासून पाताळगंगा नदीत स्फोट घडवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे मासे मृत होत असून पाण्यावर तरंगतात. त्यामुळे कमी परिश्रमात जास्त मासे मिळतात; मात्र नदीत स्फोट घडवल्याने कासव, बेडूक, छोटे मासे, साप आदी जलचर मृत्युमुखी पडत असल्याची तक्रार किनार्यालगतच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे; तर काही वेळा स्फोटासाठी नदीत बॉम्ब फेकताना तो हातातच फुटून काही जण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.