ना.रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; पुरस्कारांचे वितरण
| जांभे-पोंभुर्ले | विशेष प्रतिनिधी |
पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा दर्पणने सुरू केली. बाळशास्त्रींनी दर्पण मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवला; तेच काम पत्रकारितेत आजही सुरू आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून क्रांती घडवत असतात. भौतिक प्रगतीच्या, विकासाच्या मागे पत्रकारिताही दडलेली असते, असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीफ तर्फे देण्यात येणार्या राज्य पातळीवरील प्रतिष्ठित 30 व्या दर्पण पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे व राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ना. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, माजी सरपंच सादिक डोंगरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, सुधाकर जांभेकर आदी उपस्थित होते.
सन 2022 च्या प्रतिष्ठेच्या दर्पण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार- शीतल करदेकर (मुंबई), राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार कोकण विभाग- शैलेश पालकर (पोलादपूर) व सुरेश कौलगेकर (वेंगुर्ला), उत्तर महाराष्ट्र विभाग- जयप्रकाश पवार (नाशिक), विदर्भ विभाग- डॉ. राजेंद्र मुंढे (वर्धा), पश्चिम महाराष्ट्र विभाग- अनुराधा कदम (कोल्हापूर), मराठवाडा विभाग- प्रल्हाद उमाटे (नांदेड), विशेष मदर्पणफ पुरस्कार- सदाशिव मोहिते व किरण बोळे (फलटण) आदींना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले तर सूत्रसंचालन विश्वस्त अमर शेंडे यांनी केले.