। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिक्षक मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना आमदारकीच्या प्रॉटोकॉलचे पालन करीत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे जास्तीत जास्त यशस्वी प्रयत्न केले. सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांची मोट बांधून दबाव गट निर्माण करीत मागण्या मान्य करण्यास शासनाला भाग पाडले असे उद्गार शेतकरी कामगार पक्षाचे नेते कोकण शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आ. बाळाराम पाटील यांनी काढले. महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटनेने आयोजि केलेल्या शिक्षक संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, शैला पाटील, माजी सभापती जनार्दन तथा बाळूशेट पाटील, अलिबाग तालुका शेकाप चिटणीस अनिल पाटील, शहर चिटणीस अशोक प्रधान, दत्ता ढवळे, मुख्याध्यापिका सुजाता पाटील, अॅड सचिन जोशी, कुंदा गावंड, वृषाली ठोसर, सुरेश घरत, सुषमा पाटील, संजना किर आदी उपस्थित होते.
बाळाराम पाटील यांनी पुढे बोलताना आपल्याला निवडून देणारे शिक्षक आहेत हे लक्षात घेवून शिक्षण संस्था यांचा मान खालावी लागणार नाही असे काम केले. शासनाच्या एक लाख कर्मचारी, शिक्षक आहेत ते लोक एक रुपया देखील बिना पगारी काम करणार्या शाळांना अनुदान देण्याचे काम केल्याचा आनंद आहे. राज्यातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले हा प्रश्न सोडविण्याचे काम केले. अनुदानाचा टप्पा देण्याचा प्रकार हा देखील शासन देताना सहजासहजी दिले नाही. तो निर्णय शिक्षण क्षेत्राशी ऐतिहासिक निर्णय आहे असे सांगून माझ्या मतदार यांना दिलेला शब्द पाळला आहे. अनुदानाचा दुसरा टप्पा मिळविण्यासाठी शरद पवार यांना भेटून बिना पगारी कामगार वर्ग यांचा प्रश्न मांडला आणि त्यांनतर आमच्या सर्व आमदारांना न्याय देण्याची मागणी मान्य केली त्यावेळी 21 हजार शिक्षकांना अनुदान मिळाले होते. तरी देखील 60 हजार कर्मचारी आणि शिक्षक यांनी त्या कामगारांना न्याय देण्यासाठी पायी दिंडीचे नोटीस दिली आणि शासन काही करीत नसल्याने आम्ही पायी दिंडी सुरू केली.
पुण्यातील भिडे वाडा येथील फुले दांपत्याने स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि आम्ही त्याच ऐतिहासिक ठिकाणावरून पायी दिंडी काढली. पण काही झाले नाही आणि शेवटी आम्ही मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सात शिक्षक आमदार म्हणून आम्ही आंदोलन सुरू केले होते. अशा आंदोलनातून शिक्षकांच्या कामगारांचा अनुदानाचा विषय संपवून शिक्षकांना न्याय देण्याचा प्रश्न सोडविण्यात आम्हाला यश आले असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी माहिती दिली.
शिक्षण आमदार आणि पदवीधर आमदार हे आम्ही सर्व जुनी पेन्शन योजनेबद्दल आग्रही असून आम्ही त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
आ. बाळाराम पाटील
आपल्या सहा वर्षाच्या काळात आपण सहा जिल्ह्यात फिरलो पण कुठेही हॉटेल मध्ये राहिलो नाही आणि जेवायला गेलो नाही, असे यावेळी सांगितले. आपल्या मतदारसंघातील सर्व शाळांना निधी देणे शक्य नसल्याने अन्य खासदार तसेच आणि विधान परिषद सदस्यांच्या निधीतून सर्व शाळांना निधी देण्याचा प्रयत्न केले असल्याचे समाधान व्यक्त केले.
माजी आमदार पंडित पाटील यावेळी म्हणाले की, बाळाराम पाटील यांचा विजय निश्चित आहे. शिवसेनेचे कार्यकारी प्रमूख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सोपा झाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पाठिंबा दिल्याने सर्व मित्रपक्षाची ताकद असल्याने पारडे निश्चित जड आहे. मात्र तरी देखील गाफिल न राहता सर्वांनी नीट काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बाळाराम पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात कोकणातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिकपणे काम केले. त्यात त्यांना यश आले आहे.
पंडित पाटील
माजी आमदार
शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी प्रास्ताविक करताना महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटनेचे उमेदवार बाळाराम पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्व शिक्षक तसेच शेकाप व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. आभारप्रदर्शन माजी सभापती चित्रा पाटील यांनी केले. तर सूत्रसंचलन संदीप जगे यांनी केले.
यावेळी शेकाप नेत्या शैला पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना आ. बाळाराम पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.