। नेपाळ । वृत्तसंस्था ।
नेपाळमध्ये रविवारी (दि.15) मोठा विमान अपघात झाला. नेपाळच्या पोखरा इथं यति एअरलाईन्सचं विमान एटीआर-72 क्रॅश झालं. हे विमान 15 वर्षे जुने होते. नेपाळमधील जवळपास पाच वर्षांतील हा सर्वात भीषण अपघात होता.
यति एअरलाईन्सच्या या विमानाचं उड्डाण काठमांडूमधून झालं होतं. यामध्ये 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. या अपघातात या सगळ्यांचाच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आता या अपघातामागचं कारण कळलं आहे. सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे विमानाचा वरचा भाग थोडा वर गेला आणि त्यानंतर विमानाचे पंख डाव्या बाजूला झुकले, अशा पद्धतीने हा अपघात झालेला असू शकतो. पण संपूर्ण सखोल तपास झाल्यानंतर या अपघाताचं कारण कळेल, अशी माहिती क्रॅशची चौकशी करणाऱ्या टीमच्या एका सदस्याने दिली आहे. मात्र, विमानाची दिशा चुकणे, विमानातल्या सिस्टीमध्ये बिघाड किंवा थकलेला पायलट अशी काही या अपघाताची कारणं असू शकतात.
तसेच नेपाळच्या यति एअरलाइन्सने चालवलेल्या ट्विन-इंजिन एटीआर-72 विमानात 15 परदेशी नागरिकांसह 68 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते. परदेशी नागरिकांमध्ये पाच भारतीय, चार रशियन, दोन दक्षिण कोरियाचे आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि फ्रान्सचा समावेश आहे.
भारतीय प्रवाशांचे नाव आले समोर
यती एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभिषेक कुशवाह, विशाल शर्मा, अनिल कुमार राजभर, सोनू जैस्वाल आणि संजना जैस्वाल अशी विमानात बसलेल्या पाच भारतीयांची नावे आहेत. भारतीय दूतावासानेही 68 प्रवाशांमध्ये पाच भारतीयांचा समावेश असल्याची पुष्टी केली आहे.