कोलंबीदेखील गायब; मार्केटमध्ये छोट्या सुरमुई
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
विविध कारणांनी यंदा वातावरणात सातत्याने अनपेक्षित बदल होत असल्याने मासेमारीला मोठा आर्थिक फटका बसून पारंपरिक मच्छिमार हवालदिल झाला असून, प्रपंच चालविणे अवघड बनले आहे. मासळी मिळत नसल्याने नौका किनार्यावर नांगरून ठेवण्यात आल्या असून, मच्छिमारांचे आर्थिक बळ पूर्णतः संपले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मुरूड तालुक्यातील राजपुरी बंदरात 80 ते 100 नौका असून, मासळी मिळत नसल्याने या नौका किनार्यावर बांधून ठेवण्यात आल्या आहेत. राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छिमार धनंजय गिदी म्हणाले की, थंडी खूप असून, पाणी थंड होत असल्याने किनार्यावर आलेली मासळी खोल पाण्यात पलायन करते. त्यामुळे छोट्या पारंपरिक मच्छिमारांना मासळी मिळत नाही. या भागात कोलंबी भरपूर मिळत असे. आता मात्र या विरुद्ध परिस्थिती आहे. मच्छिमारांना खायलाच मासळी नसल्याने अवस्था बिकट बनली आहे. मुलांचे शिक्षण, बँक कर्जाचे हप्ते, किराणा सामान, अन्य खर्च भागविण्यासाठी मच्छिमारांची दमछाक उडत आहे.
गारठा अधिक वाढल्याने कोलंबीचे प्रमाण फक्त 30 टक्क्यांवर आल्याची माहिती एकदरा येथील मच्छिमार नाखवा रोहन निशानदार यांनी दिली. डिझेलचा खर्चदेखील मिळत नाही अशी स्थिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मार्केटमध्ये बाहेरगावहून आलेल्या फक्त छोट्या सुरमई, बांगडे, मांदेली अशीच छोटी मासळी उपलब्ध होत असून, खवय्ये, पर्यटकदेखील हैराण झाले आहेत.
मच्छिमारीस गेल्यावर पूर्वी एका नौकेला 150 ते 200 किलो कोलंबी मिळत असे. परंतु, आता एका नौकेला 10 ते 15 किलो कोलंबी मिळते, अशी माहिती मच्छिमारांनी दिली. समुद्रात रोज विचित्र परिस्थिती निर्माण होत असल्याने पारंपरिक मासेमारी ठप्प झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. सुरमईसारख्या मासळीचे दर सरासरी 700 ते 800 प्रतिकिलोपर्यंत अटकेपार गेले आहेत. यामुळे अनेकांना अखेर चिकनकडे वळावे लागले आहे. उथळ पाण्यात ऊबदारपणा नसल्याने मासळी खोल समुद्रात जात असते.
मुरूडच्या पद्मदुर्गाजवळ अदानी प्रकल्पासाठी चिखल उपसून बाजूला टाकण्यात आल्यानेदेखील कोलंबीवर परिणाम झाला आहे. येथे जाळी फाटूनदेखील नुकसान होत आहे.
रोहन निशानदार, नाखवा
थंडी खूप असून, पाणी थंड होत असल्याने किनार्यावर आलेली मासळी खोल पाण्यात पलायन करते. त्यामुळे छोट्या पारंपरिक मच्छिमारांना मासळी मिळत नाही.
धनंजय गिदी
मच्छिमार, राजपुरी