| महाड | प्रतिनिधी |
नूतन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याला नुकतीच भेट देऊन महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्याचप्रमाणे त्यांनी किल्ले रायगडावर सुरु असलेल्या विकासकामांची देखील पाहणी म्हसे यांनी कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी आणि मतदान केंद्राला भेट दिली. तहसील कार्यालयामधील मतदान केंद्राचा आढावा घेत तहसील कार्यालयातील कर्मचार्यांशी संवाद साधला. यावेळी प्रांत प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, सुधीर शेठ हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू रायगड किल्ल्यावरील विविध विकासकामांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे सपत्नीक दर्शनही घेतले. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील, कार्यकारी अभियंता महेश नामदे, सहाय्यक अभियंता स्वप्निल बुर्ले, रायगड विकास प्राधिकरणाचे विशाल भामरे महाडमधील महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पत्रकार संघाकडून स्वागत
महाड संघाकडून नव जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, योगेश भामरे, उदय सावंत, सिकंदर अनवारे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. योगेश म्हसे यांनी महाड ही सामाजिक क्रांतीची प्रेरणा असलेली भूमी असल्याने याठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन कामाची सुरवात केल्याचे डॉ.म्हसे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाड मधील स्वच्छतेचे कौतुक देखील केले.