| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चिंचवली येथील रहीवाशी असलेल्या तरुण उद्योजक तथा आंबा बागायतदार वरुण संजयकुमार पाटील यांच्या पेण येथील राठीची येथील बागेतून पहिली हापूस आंब्याची पेटी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे यंदा देखील या आंबा बागायतदाराने हा मान मिळविला आहे. सलग दोन वर्षे पाटील यांची आंबा पेटी कोकणातून सर्वप्रथम बाजारात दाखल होत आहे.
एरव्ही मार्च, एप्रिल, मे महिन्यात उत्पादीत होणारा हापूस आंबा जानेवारी महिन्यात उपलब्द झाला मार्केटमध्ये चांगला भाव मिळवून देणार असल्याने वरूण पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. पाटील यांची एकूण आंबा बाग 50 एकर क्षेत्रावर असून ती जीआय रजिस्टर आहे. रोहा, अलिबाग, पेण या ठिकाणी बागायती असून मोठ्या कष्टाने या बागा फुलविण्याचे काम पेशाने इंजिनिअर असलेले वरुण पाटील करीत आहेत.
आंब्याची पहिली पेटी बाजारात दाखल होत असून डझन 5 हजार प्रमाणे भाव अपेक्षित आहे. वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ म्हणून बागेत आंबा फळ डौलाने बहरले आहे. कोरोना संकटातही बाजारपेठ बंद असताना सुद्धा थेट विक्रीवर भर देऊन ग्राहकांपर्यंत हापूस आंबा पोहचविण्याची जबाबदारी वरुण पाटील यांनी पार पाडली. येथील हापूस आंबा परदेशातही गेला. अमेरिका, न्यूझीलंड, दुबई, युरोप आदी परराष्ट्रात ही कोकणच्या हापुसची चव आवडीने चाखली जाते, याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे वरूण पाटील यांनी सांगितले.