| तळा । वार्ताहर ।
शहराच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही जैसे थे अवस्थेत असल्याने तळा वासीयांना पाण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. गेली कित्येक वर्ष तळा शहराची पाणी समस्या कायम आहे. पाण्याच्या समस्येमुळे येथील विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग आपल्या कुटुंबासह शेजारील तालुक्यात राहणे पसंत करतात. केवळ कामानिमित्त शहरात येत असलेला शासकीय वर्ग राहायला मात्र शहरापासून दूर जातात व त्याठिकाणीच दैनंदिन जीवनात लागणार्या गोष्टी खरेदी करीत असल्याने याचा परिणाम तळा बाजारपेठेवर झाला आहे.
दिवसेंदिवस बाजारपेठ ओस पडत चालली असून नवनवीन व्यवसाय करणे राहिले दूरच परंतु आहेत ते व्यवसाय देखील हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र येथील राजकारण्यांना याच काही एक पडलेलं नाही. पाणी योजना राबविण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मध्यंतरी बॅनर बाजीला देखील ऊत आला होता. मात्र प्रत्यक्षात योजनेचा थांगपत्ताच नाही. योजना नक्की कोठे बारगळली, योजना पूर्ण होण्यास काय अडचण येत आहे याकडे मात्र कोणीही लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली तळा शहराची पाणी योजना पूर्ण होणार तरी कधी, असा प्रश्न आता तळावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.