| महाड । प्रतिनिधी ।
राज्यात विविध भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले आणि गारांचा पाऊस कोसळला. या गारपिटीने तालुक्यातील कडधान्य आणि आंबा उत्पादनात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी दुपार पर्यंत महाडमध्ये उन्हाचे चटके जाणवत असताना अचानक संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडण्याची शक्यात निर्माण झाली होती. तालुक्यातील विविध भागात सायंकाळी अचानक पावसाच्या सरी कोसळून परिसरात जन जीवन विस्कळीत झाले. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंबा व्यवसाईक तसेच वीट भट्टी मालक संकटात सापडले आहेत. आंबा आणि वीट उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले असून आंबा पिकाच्या विक्रीवर देखील परिणाम जाणवणार आहे. पाऊसामुळे आंबा बागायतदार शासनाकडून मदतीच्या नक्कीच अपेक्षेत आहेत. अवकाळी पावसा मुळे सामान्य नागरिकां पासून शेतकरी वर्ग चिंतीत आहेत. सायंकाळी चार वाजता महाड परिसरात आकाशात ढग दाटून आल्याने गारांचा पाऊस झाला. यामुळे कामावरून सुटलेल्या कामगारांना आणि रस्त्यावरील वाहनांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत विक्रीस बसलेल्या विक्रेत्यांचे देखील हाल झाले. महाड तालुक्यात किल्ले रायगड परिसर, महाड शहर, दासगाव खाडी पट्टा, आदी भागात गारांचा पाऊस झाला.







