नगरपंचायतीने नळ कनेक्शन तोडण्याचा उचलला बडगा
| माणगाव । वार्ताहर ।
नागरी सुविधांची माणगाव नगरपंचायतीकडून अपेक्षा धरणार्या नागरिकांना पाणीपट्टी कर व मालमत्ता कर भरण्यास नगरपंचायतीने तगादा लावला आहे. गेली दहा वर्षापासून अनेक बिल्डिंग, कॉम्प्लेक्स मालकांनी पाणीपट्टी कर थकविल्यामुळे नगरपंचायतीने या बड्या सदनिकाधारकांना त्वरित पाणीपट्टी कर भरावा यासाठी आगाऊ नोटीस दिली होती. मात्र, या नोटीसीची दखल न घेणार्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरु केल्याने बड्या सदनिकाधारकांचे धाबे दणाणले आहेत.
शहरात अनेक मोठ्या सदनिका आहेत. यापैकी बहुतांशी सदनिका धारकांनी गेली दहा वर्षापासून नगरपंचायतीचा पाणीपट्टी कर भरला नसल्याने नगरपंचायतीने या सदनिकाधारकांना पाणी कनेक्शन तोडण्याबाबत नोटीस दिल्या होत्या. मात्र, अनेक सदनिकाधारकांनी पाणीपट्टी कर भरण्याकडे पाठ फिरवली. नगरपंचायतीने घालून दिलेल्या मुदतीनंतरही पाणीपट्टी कर भरला नसल्याने नगरपंचायतीने माणगावमधील आरोग्य बिल्डिंग दत्तनगर, जालगावकर जुनी चाळ गार्डनजवळ कचेरी रोड, स्काय व्हीव्यू कचेरी रोड, तनजीन कॉम्प्लेक्स जुने माणगाव, पल्लवकर कॉम्प्लेक्स रेल्वे स्टेशन नाणोरे या पाच कॉम्प्लेक्सवर नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरु केली. त्यापैकी आरोग्य बिल्डिंग दत्तनगर या सदनिकाधारकांनी पाणीपट्टी कर नगरपंचायतीकडे भरणा केला आहे. उर्वरित सदनिकाधारकांनी कर भरला नसल्याने त्यांच्यावर पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई नगरपंचायतीने केली आहे.
नगरपंचायतीचा चालू पाणीपट्टी कर थकबाकी 73 लाख 43 हजार 631 रुपये तसेच मागील थकबाकी 60 लाख 90 हजार 393 रुपये असे एकूण 1 कोटी 34 लाख 34 हजार 54 रुपये थकला आहे. सामान्य नागरिक पाणीपट्टी कर थोड्या फार प्रमाणात भरतात. मात्र, मोठे सदनिकाधारक पाणीपट्टी कर भरत नाहीत. काही सदनिकाधारकांकडे नगरपंचायतीची दहा वर्षाची पाणीपट्टी कर थकीत आहे. या सर्वांना नगरपंचायतीची मालमत्ता कर व पाणी कर भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. हा कर न भरणार्यांना नगरपंचायती कडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच थकबाकीदारांचे सदनिकेसमोर ढोल बजाव आंदोलन नगरपंचायतीकडून केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर, जप्तीच्या नोटीस देऊन नगरपंचायत कारवाई करणार आहे.