| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगर परिषद परिक्षेत्रातील महिलांच्या सहभागातून स्वच्छोस्तव 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी हिरव्या रंगाचा वेष परिधान करून डोक्याला केशरी रंगाचा जरी पटका बांधला होता. अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात उपस्थित सर्व महिलांना स्वच्छतेची शपथ दिली गेली. त्यावेळी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर पदक प्राप्त कुस्तीपटू मुलींनी स्वच्छतेचा संदेश देणार्या रॅलीचे मशाल घेऊन नेतृत्व केले. या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे, उपमुख्याधिकारी गौतम बगळे, श्रीमती कदम, जयश्री धायगुडे, दिपक खेबडे, विनय शिपाई, डॉ. संगीता वानखेडे, माधवी रिठे भक्ती साठेलकर इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संपन्न झालेल्या करमणूक कार्यक्रमात महिला कलाकारांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सांघिक अशा नृत्याविष्कारराचे सादरीकरण झाले. नृत्य नाटिकेतून स्वच्छते संबंधीचा संदेश प्रसारित करण्यात आला. आयोजनात सहभागी झालेल्यांचे खेबडे यांनी आभार मानले. जगदीश मरागजे आणि अदिती पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.