। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
खारघरमधील उष्माघात प्रकरणात 14 जणांचा मृत्यू झाला. या मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर आला असून डॉक्टरांनी मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे. नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाखोंची उपस्थिती होती. कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्यामुळे नागरिकांना प्रचंड उन्हात 6 ते 7 तास बसून राहावं लागलं. त्यामुळे उष्माघातामुळे त्यातील 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता या 14 जणांचे शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आले असून त्यांच्या शरीरात पाण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या 14 पैकी 12 जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे. अर्थात, मृत्यूपूर्वी किमान 6 ते 7 तास त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. इतर दोघांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काही खाल्लं होतं किंवा नाही यासंदर्भात स्पष्टता येऊ शकलेली नाही. शिवाय, त्यांनी पाणीही अत्यंत कमी किंवा अजिबात न प्यायल्याचंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. कार्यक्रमस्थळी कडक उन्हात आणि उकाड्यात त्यांना बसावं लागल्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती, अशी माहिती शवविच्छेदन प्रक्रियेशी संबंधित एका डॉक्टरांनी दिली.
त्यातल्या काहींना पूर्वव्याधीही होत्या. त्यांनी मृत्यूपूर्वी काही तास काही खाल्लेलं नव्हतं किंवा पाणी प्यायलं नव्हत. दरम्यान, या डॉक्टरांनी मृत्यूमुखी पडलेल्या 14 जणांपैकी एकाला ह्रदयाशी संबंधित आजार असल्याचीही माहिती दिली. एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन किंवा ह्रदयाशी संबंधित आजार असेल, तर अशा व्यक्तीला डीहायड्रेशनचा अधिक त्रास होऊ शकतो असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे मधुमेहाचा त्रास असणार्यांनाही अशा परिस्थितीचा जास्त त्रास होतो, असंही या डॉक्टरांनी सांगितलं.