। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सागर मित्रांची निवड केली जाणार आहे. या मित्रांच्या मदतीने मच्छीमारांना प्रशिक्षण देण्याबरोबरच क्षमता वाढीसाठी गतीशील करणे आणि योजनांबाबत जनजागृती करणे अशा अनेक उपक्रमातून सरकार व मच्छीमार यांच्यामधील दुवा ठरणार आहेत.
मच्छिमारांना प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत जिल्ह्यात 45 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सागरमित्र या पदाची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. मासळी उतरविण्याची केंद्रांची नावे, सागरमित्र नेमणूकीबाबत अटी व शर्ती आणि कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.
मासळी उतरविण्याची केंद्रे उरण तालुक्यातील उल्वे-मोहा, दिघोडे, केळवणे, वरेडी, करंजा, नवापाडा, मोरा, मोरावे-गव्हाण, हनुमान कोळीवाडा, आवरे. अलिबाग तालुक्यातील धरमतर, अलिबाग, थळ, नवगाव, आग्राव, रेवस गदिना, सासवणे, वर्सोली चाळमाळा, साखर आक्षी, थेरोंडा, रेवदंडा, मुरुडमधील साळाव, कोर्लई, बोर्ली मांडला,न्हावे, चोरढे, नांदगांव-मजगांव, मुरुड, एकदरा, राजपुरी, खामदे, आगरदांडा. तसेच श्रीवर्धनमधील दिघी, वाशी, कुडगाव, आदगाव, मेंदडी, खरसई, पाभरे, खारगांव, भरडखोल-दिवेआगार, बागमांडला, शेखाडी, जिवना, मूळगाव दांडा या ठिकाणी आहेत.
अटी व शर्ती पुढीलप्रमाण- शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा मधून उत्तीर्ण असावे/असावी. ज्या उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता जास्त असेल तर त्यास प्राधान्य देण्याचे प्रावधान आहे. मत्स्यविज्ञान पदविका (ऋळीहशीळशी ऊळश्रिेार) 3 वर्षे उत्तीर्ण उमेदवार हा इयत्ता 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण समकक्ष ग्राह्य धरण्यात येईल व मत्स्यविज्ञान पदविका उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा 18 वर्षा पेक्षा कमी व 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे. स्थानिक किनारपट्टीवरील मच्छीमार गावातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात द्यावे. उमेदवारास संगणक तसेच सांख्यिकी माहितीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराची नेमणूक फक्त गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. सर्व सागरमित्रासाठी प्रति महिना रु.15 हजार प्रति सागरमित्र याप्रमाणे एकसमान प्रोत्साहन/ मानधन देण्यात येईल.
सागरमित्रांची नेमणूक संपूर्णतया अर्धवेळ आधारावर असेल. नियुक्त केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील उमेदवारास नियमित कर्मचार्याप्रमाणे नियम, अटी व शर्ती लागू राहणार नाहीत तसेच त्यांना नियमित कर्मचार्यप्रमाणे कोणतेही वेतन व भत्ते तथा अनुषंगिक लाभ अनुज्ञेय/लागू राहणार नाहीत. नियुक्त केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील उमेदवारास सेवेचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर किंवा आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयावर राहणार नाही. नियुक्त केलेल्या उमेदवार यांनी कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. नियुक्त केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील उमेदवारास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा सामावून घेण्याबाबतचे वा नियमित सेवेचे कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/ हक्क नसेल.उमेदवाराने स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
सागर मित्रांचे कार्य
सागरमित्र हे सरकार आणि मच्छिमार यांच्यातील इंटरफेस आहेत, आणि कोणत्याही सागरी संपर्कातील प्रथम व्यक्ती म्हणून काम करतील, तसेच मच्छीमारांच्या मत्स्यव्यवसाय संबंधित मागण्या/ सेवांची माहिती देण्याचे काम करेल. स्थानिक मच्छीमारांमध्ये विविध सरकारी योजना आणि कार्यक्रम बाबत जनजागृती करणे.प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहन करतील. मत्स्योत्पादन संकलनाचे काम पाहतील. मत्स्योत्पादन, मत्स्य किमती इ. यांच्या माहितीचे संग्रह करून संकलित करतील. मच्छिमारांना प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी गतीशील करणे, यासारखी कामे करणे क्रमप्राप्त असेल. तरी मच्छिमार गावातील वरील नमूद अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज, पूर्ण माहिती या कार्यालयास दि.25 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावेत. प्राप्त अर्जांचा विचार करून मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल व गुणवत्तेनुसार सागरमित्र निवडण्यात येतील, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय संजय वा.पाटील यांनी कळविले आहे.