। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील 240 शिक्षक रत्नागिरीसह सिंधुदूर्ग अशा एकूण 17 जिल्ह्यांत बदली होऊन जाणार असून अन्य जिल्हयातून केवळ 53 शिक्षक रायगड जिल्ह्यात बदली होऊन येणार आहे. ही प्रक्रीया सुरु असून तालुका स्तरावर कागदपत्रांची पडताळणी सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांच्याकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या 2603 शाळा असून त्या शाळांमध्ये 95 हजार 983 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये 5749 शिक्षक कार्यरत आहेत. त्यात 46 मुख्याध्यापक, 4 हजार 761 उपशिक्षक, व 942 पदवीधर आदींचा समावेश आहे.
ग्रामविकास विभागाच्या 27 फेब्रुवारी 2023 च्या सुधारित पत्रानुसार, 2017 ते 2022 पर्यंत ज्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही, त्या शिक्षकांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, 2022 मध्ये रायगड जिल्ह्यातून बदली होण्यासाठी 249 शिक्षक पात्र ठरले आहेत. त्यात मराठी माध्यमातील 237 व उर्दू शाळेतील 12 शिक्षकांचा समावेश आहे. पात्र ठरलेल्या 249 शिक्षकांपैकी 9 शिक्षकांनी अन्य जिल्ह्यात जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 240 शिक्षकांच्या बदल्या करण्याची प्रक्रीया तालुका स्तरावर सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कागदपत्रांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे.
ही बदली गतवर्षापासून सुरु असून या शिक्षकांना 30 एप्रिलपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार ही प्रक्रीया युध्दपातळीवर सुरू आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात येणार्या शिक्षकांची संख्या 53 आहे. त्यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातून 15, पालघरमधून 7, रत्नागिरी 9 व बीड, नगर अशा एकूण 17 जिल्ह्यातून शिक्षक रायगड जिल्ह्यातून येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.