। पोलादपूर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पोलादपूर येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलादपूर तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक राजेंद्र दत्तात्रेय केकान (३३, मूळ गाव- शिरूर कासार, बीड) यांनी रविवारी (दि.30) कोणत्यातरी अज्ञात कारणाने तहसील कार्यालयात जाऊन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजेंद्र यांनी आत्महत्या केल्याचे महाराष्ट्र दिनी सोमवारी (दि.1) सकाळी 7 च्या सुमारास एका तहसील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. पोलादपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.
अधिक तपास पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार करत आहेत.