| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील चोरोंडे येथील जय हनुमान क्रीडा मंडळ आयोजित मापगाव पंचायत प्रीमियर लीग 2023 पहिल्या पर्वाचा जय मल्हार वॉरियर्स चोरोंडे संघ मानकरी ठरला. ही क्रिकेट स्पर्धा दि. 7 व 8 मे रोजी चोरोंडे येथील क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता.
यावेळी अंतिम सामना चंद्रकांत मल्हार पुरस्कृत जय मल्हार वॉरियर्स चोरोंडे संघ विरुद्ध वस्सीम कुर पुरस्कृत ए 3 स्पोर्ट्स सोगाव संघ यांच्यात झाला. यावेळी अटीतटीच्या सामन्यात जय मल्हार वॉरियर्सने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर ए 3 स्पोर्ट्स सोगावने द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी सिक्सर किंग म्हणून विशाल राऊत-शीव प्रतिष्ठान मापगाव संघ याला सन्मानित करण्यात आले. तर, उत्कृष्ट गोलंदाजचा मान साई राणे-सान्वी स्पोर्ट्स चोरोंडे संघ याला देण्यात आला. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून ऋत्विक माने-जय मल्हार वॉरियर्स चोरोंडे संघ याला गौरविण्यात आले. स्पर्धेचा मालिकावीर म्हणून रब्बान शेख-ए 3 स्पोर्ट्स सोगाव संघ याला घोषित करत त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
सर्व विजेत्या संघांना व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मापगाव पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ चोरोंडे संघाच्या सर्व खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत सूत्रसंचालन व समालोचन निनाद कदम, यश मापगावकर, नदीम वाकनिस, रसिक काळे यांनी उत्तमरीत्या करत उपस्थितांची मने जिंकली.