केंद्रातील मोदी सरकारने सर्व विरोधी पक्षांना सळो की पळो करून सोडले आहे. जो पक्ष आपल्या मार्गात येईल असे वाटेल त्याच्या नेत्यांविरुध्द इडी, सीबीआय किंवा तत्सम चौकशा सुरू करणे आणि शेवटी तुरुंगात टाकणे असे प्रकार चालू आहे. ही अघोषित अशी पोलिसशाही चालू आहे. दुसरीकडे भाजपने राजकीय वातावरण पूर्णपणे प्रदूषित करून ठेवले आहे. हरेक गोष्ट हिंदू विरुध्द मुस्लिम या चष्म्यातून पाहण्याची अत्यंत घातक रीत त्यांनी रूढ केली आहे. त्यामुळेच बजरंग दलावर बंदी घालण्याचा विचार म्हणजे हनुमानाचा अपमान असा बाष्कळ दावा नरेंद्र मोदींनी कर्नाटकाच्या प्रचारात केला. केरला स्टोरी या मुस्लिमद्वेष्ट्या चित्रपटाचीही त्यांनी भलामण केली. या स्थितीत कोणाही विरोधी पक्षांना आपले मुद्दे मांडणे किंवा लोकांचे प्रश्न घेऊन झगडणे कठीण होत चालले आहे. दिल्लीत शेतकर्यांनी आंदोलन केले किंवा कुस्तीगिरांनी त्यांच्या प्रश्नासाठी धरणे धरले तर त्यांना भाजपविरोधी आणि पर्यायाने देशद्रोही ठरवले जाते. दुर्दैवाने भाजपने बहुसंख्य जनतेची मते अशा रीतीने कलुषित करून ठेवली आहेत की या लोकांना काहीही पटवून देणे अशक्य ठरू लागले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची ताकद तुटपुंजी आहे. ते एकत्र आले तरच या विषारी वातावरणाचा मुकाबला करू शकतात. दुर्दैवाने हे त्यांना कळत असले तरी वळत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये ज्या रीतीने भांडणे चालू आहेत ते पाहून त्यांना पाठिंबा देणार्यांना हताश वाटावे अशी स्थिती आहे. दरेक दिवशी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांची एकमेकांवर टीका करणारी काही ना काही वक्तव्ये येत आहेत. संजय राऊत हे या सर्वांमध्ये आघाडीवर आहेत. त्या खालोखाल नाना पटोल यांचा क्रमांक आहे. पटोले यांनी राऊत यांना चोंबडे म्हणावे, मग राऊत यांनी पटोले यांचीच लायकी काढावी, पृथ्वीराजांनी व राऊतांनी कारण नसताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर बोलावे, मग पवार किंवा अन्य कोणी या दोघांची पात्रता काय असे विचारावे असे सध्या चालू आहे. या सर्वांपुढे आपापले पक्ष सावरण्याचे कितीतरी मोठे आव्हान आहे. सर्वच पक्षांमध्ये बरीच अस्वस्थता आहे. तरीही वज्रमूठसारख्या सभांना नागरिक गर्दी करीत आहेत. या नेत्यांपेक्षा जमिनीवरचे कार्यकर्ते अधिक शहाणे आहेत. त्यांचे आपसात झगडे कमी आहेत. भाजपशी लढाई सोपी नाही हे त्या सर्वांना कळून चुकलेले आहे. पण त्यांचे नेते मात्र वेगळ्याच विश्वात आहेत. सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष नैसर्गिक मित्र नाहीत. ते एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र येत आहेत हे कळण्याइतके शहाणपण जनतेमध्ये जरूर आहे. याबाबत जनता कोणत्याही भ्रमामध्ये नाही. म्हणूनच महाविकास आघाडीला पाठिंबा मिळतो आहे. सामान्य लोकांना जे कळते ते राजकारणात इतकी वर्षे घालवलेल्या या नेत्यांना कधी आणि कसे कळेल हा कळीचा प्रश्न आहे.