पाच दिवसात तब्बल दहा लाखांचा दंड वसूल
अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यात वाढत्या नागरीकरणाबरोबरच दळणवळणाची साधने वाढली आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत. मात्र, वाहन चालविताना अनेक जण वाहतुकीच्या नियमांचे दुर्लक्ष करून बेशिस्तपणे वाहन चालवितात. त्याचा परिणाम अनेकांना मोटार अपघातामध्ये कायमचे अंपगत्व, तर काहींना मृत्यू जवळ करण्याची वेळ येते. या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील पाच दिवसांत दीड हजार वाहन चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून दहा लाख 57 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. पर्यटकांसह जिल्ह्यातील नागरिकांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या योजनेंतर्गत रस्त्यांची कामे जोरात सुरु आहेत. काही ठिकाणी पूर्ण झाली असून, अनेक ठिकाणी अद्याप रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. पर्यटनाबरोबरच औद्योगिकीरणाचा विस्तारदेखील वाढू लागला आहे. वेगवेगळे प्रकल्प जिल्ह्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे नागरीकरणही वाढत आहे. रस्त्यांचे जाळे पसरल्याने वाहनांची गरजही निर्माण झाली आहे. दुचाकी वाहनांसह तीन, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत. त्यात वेगवेगळे प्रकल्प उभे राहात असल्याने अवजड वाहने खरेदीवर भर दिला जात आहे. दरम्यान, वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सर्रासही करताना आढळून येत आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट घेणे, रस्त्यावर वाहन उभे करणे, वाहन परवाना नसणे, ज्यादा प्रवासी वाहतूक, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, अवजड वाहनातून नेत असलेल्या रेती, माती आदी मालांचा वाहतूक परवाना नसणे, असे प्रकार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सुरू असतात. या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून वाहतूक पोलीस नाक्या-नाक्यावर तैनात केले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु केला आहे. पाच दिवसांमध्ये एकूण एक हजार 579 वाहन चालकांविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून दहा लाख 57 हजार 950 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ऑनलाईन कारवाईवर भर
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करताना अनेक वेळा वाहतूक पोलिसांना त्यांचा पाठलाग करावा लागत होता. त्यामुळे वेळ मोठ्या प्रमाणात वाया जात होता. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी ऑनलाईन कारवाईवर भर देण्यास सुरुवात केली आहे. बेशिस्त वाहन चालकांच्या गाडीचा मोबाईलवर फोटो काढून त्याला मेसेजद्वारे त्याची माहिती दिली जाते. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा वेळही वाचण्यास मदत झाली आहे.