| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील वेध शाळेजवळ पडलेली सोन्याची चेन तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला सापडली. त्यांनी प्रामाणिकपणाने अलिबाग पोलीसांच्या ताब्यात ती चेन देऊन एक माणुसकीचे दर्शन घडविले आहे. कोणाची चेन असल्यास त्यांनी अलिबाग पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी केले आहे.
संदेश वाळंज असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा कर्मचारी अलिबाग येथील तहसील कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अलिबाग तहसील कार्यालयात ते शिपाई म्हणून काम करीत आहे. शासकिय कामानिमित्त बुधवारी सायंकाळी ते चालत जात असताना, त्यांना रस्त्याच्या बाजूला वेध शाळेसमोर एक सोन्याची चेन पडलेली दिसली. ती चेन घेऊन त्यांनी तातडीने अलिबाग पोलीस ठाणे गाठले. सुमारे अडीच तोळे वजनाची चेन पोलीसांच्या ताब्यात दिली. संदेश वाळंज यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.