पनवेल | वार्ताहर |
कामोठे येथील एका चाळीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून ते 22 ते 48 वयोगटातील आरोपी आहेत. सदर कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे.
इरशाद मुल्ली, जनुअल इस्लम, अनिउल आलम, कोकन शेख, पिंकी इस्लम, शोभा बेगम शेख, कविता शेख, रेशमा मूल, असे यातील आरोपींची नावे आहेत. कामोठे सेक्टर 22 येथील एम. जी. एम. रुग्णालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या एका चाळीत मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक राहत असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा व्हिसा नसल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी या ठिकाणी एक पथक रवाना केले. त्यावेळी तेथे राहणाऱ्या लोकांकडे विचारपूस करीत भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रांची पाहणी केली असता सदर आरोपी आढळून आले.
या आरोपींकडे भारतीय असल्याचा कुठलाच पुरावा नव्हता. तसेच आरोपींनी स्वतः बांगलादेशी असून रोजगारासाठी या देशात बेकायदेशीर घुसखोरी केल्याची कबुलीही दिली आहे. या सर्व आरोपींवर पारपत्र नियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली.