| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमध्ये गुरुवारी (दि.13) सकाळी अपघात झाला. यामध्ये रेवस येथील तरुण जखमी झाल्याची घटना घडली. हा तरुण काही कामानिमित्त एमएच 06 एएच 1576 या क्रमांकाच्या मोटारसायलने सहाणगोठी येथे आला होता. घरी परत जात असताना गतिरोधकाचा अंदाज न आल्याने गाडी स्लिप होऊन अपघात झाला. यावेळी उपस्थितांनी त्यास तातडीने रुग्णालयात उपचाराकरीता नेले.
कुरुळमधील आरसीएफ वसाहतीमधील रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. मात्र रस्त्यावर बसविण्यात आलेल्या गतिरोधकांनावर पिवळा- हिरवा पट्टा बसविण्यास आरसीएफ प्रशासन उदासीन ठरले. पट्टे न मारल्यामुळे गतिरोधक दिसून येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
थळ येथील आरसीएफ कंपनीने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कुरुळ या ठिकाणी कर्मचारी वसाहत उभारली.या वसाहतीमध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न कंपनी प्रशासनाने केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे, गार्डन कायमच आकर्षित करीत आले आहे. त्यामुळे आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये पादचाऱ्यांसह दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. वसाहतीमध्ये नागरिकांची वर्दळ असल्याने वाहनांचा वेग रोखण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. गतिरोधक वाहन चालकांच्या लक्षात यावे तसेच अपघात टाळण्यासाठी काही गतिरोधकांवर पिवळे पट्टे बसविण्यात आले आहेत. तर काही गतिरोधकांवर पट्टे बसविण्यात आले नाही. त्यामुळे वाहन चालकांना अनेक वेळा गतिरोधक दिसत नसल्याचा प्रकार समोर येत आहे.
गुरुवारी सकाळी गतिरोधक लक्षात न आल्याने एक तरुण दुचाकीवरून खाली पडला. त्याच्या हाताला व पायाला दुखापत झाली. यापुर्वीदेखील याचठिकाणी गतिरोधक लक्षात न आल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कंपनी प्रशासनाने गतिरोधकांवर पिवळे-पांढरे पट्टे बसवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता, ज्यांना पिवळे, पांढरे पट्टे बसविण्याचे काम दिले आहे, त्यांना तातडीने पट्टे बसविण्याच्या सुचना दिल्या जातील, असे सांगण्यात आले.