। मुंबई । प्रतिनिधी ।
शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. शुक्रवारी (दि.14) राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचं खातं वाटप करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी या बाबतची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या गटाला अत्यंत महत्त्वाची खाती मिळाली आहेत. अर्थ, सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा तसेच महिला व बालकल्याण आदी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत.
विशेष म्हणजे या खाते वाटपात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाकडील महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत. खाते वाटपात शिवसेना मंत्र्यांची तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. कृषी, अन्न व प्रशासन आणि अन्य एक खातं राष्ट्रवादीला मिळालं आहे. तर मुख्यमंत्र्यांकडील परिवहन व अल्पसंख्याक खाते शिवसेना मंत्र्यांना मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात आपल्या 8 नेत्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या 8 सहकाऱ्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. तर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने विरोध केला होता. त्यामुळे खाते वाटप रखडलं होतं. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
शिंदे-भाजप सरकारसोबत राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. सत्ताधाऱ्यांमध्ये खातेवाटपावरुन नाराजी नाट्य सुरू झाल्याचे चित्र दिसून आलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर हे चित्र स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लटकला, मात्र मंत्र्यांच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर आता खातेवाटपाबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांना अखेर अर्थ खातं मिळालं आहे.
राष्ट्रवादीचे खातेवाटप
अर्थ- अजित पवार, कृषी- धनंजय मुंडे, सहकार- दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ, अन्न नागरी पुरवठा- छगन भुजबळ, अन्न आणि औषध प्रशासन- धर्मराव अत्राम, मदत आणि पुनर्वसन- अनिल भाईदास पाटील, क्रीडा- संजय बनसोडे, महिला आणि बालकल्याण- अदिती तटकरे.