| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीसह पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखीपत्राद्वारे केली आहे.
पेण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत ही कमकुवत व जीर्ण झालेली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येते. ही इमारत जुनी असून, या इमारतीमध्ये बाजार समितीचे कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांचे कार्यालय, तसेच अनेक व्यावसायिक गाळे आहेत. भविष्यात येथे कोणताही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीची उपाय योजना म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती पेणच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे आवश्यक आहे. तरी याबाबत सर्व संबंधिताना सुचना देऊन सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अलिबाग येथे जि.प.च्या शिवतीर्थाची निर्मिती करताना तत्कालिन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली असावीत असा दृष्टीकोन ठेवला होता. त्यानुसार त्यांनी कार्यवाहीही केली. पण आता विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी हे जि.प.ची कार्यालये निरनिराळ्या ठिकाणी ठेवत आहेत. याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
अलिबाग येथील जिल्हा परिषद इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना ज्याप्रमाणे दिल्या आहेत तशाच सूचना पेण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीबाबत देण्यात याव्यात. कारण पेण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत अलिबाग जिल्हा परिषदेच्या इमारतीपेक्षा कितीतरीपटीने जीर्ण झाली आहे. त्यामुळे दुर्घटना घडून वित्त व जीवितहानी होऊ नये याची काळजी जिल्हाधिकारी व संबंधिताने घेणे गरजेचे असल्याने सदर इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे पत्र दिले असल्याचे पंडित पाटील यांनी सांगितले.