पाच आरोग्य केंद्रांत होणार तज्ज्ञांकडून तपासणी
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात आपला दवाखाना तसेच पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लवकरच सात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. यामध्ये एमडी फिजिशियन, बालरोग, स्त्रीरोग, यांच्या सेवा आठवड्यातून एक दिवस; तर त्वचारोग, नेत्ररोग, कान-घसा-नाक, मनोविकार यांची पंधरा दिवसातून एकदा सेवा मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा मिळावी, म्हणून महापालिकेने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळच्या ओपीडीबरेाबरच दुपारी 2 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबच महापालिकेने वैद्यकीय सेवा अधिक बळकट करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. त्यानुसार खारघर येथील आपला दवाखाना तसेच महापालिका क्षेत्रातील गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, कळंबोली, खारघर, कामोठे, पालेखुर्द येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत सात प्रकारच्या आरोग्य सेवातज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच या सेवा सुरू झाल्यानंतर याची माहिती प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पनवेल महापालिका पायाभूत सुविधांमध्ये वैद्यकीय आरोग्य सेवांवर भर देत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध सात प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर सेवेत रुजू होणार आहेत. या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.
गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिका
महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुमारे 40 प्रकारच्या रक्त चाचण्या मोफत केल्या जात आहे. याशिवाय महापालिका आरोग्य सेवांमध्ये वाढ करत असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा लवकरच सुरुवात करणार आहे.
डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी