| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गेले दहा बारा दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुरूड तालुक्यात भात शेती पाण्याखाली गेली असून शेतीला अक्षरशः पाण्याचा वेढा पहायला दिसून येत आहे. त्यामुळे आर्द्रा नक्षत्राने तारले असले तरी म्हाताऱ्याच्या पावसाने मात्र मारले असल्याची खंत यशवंतनगर पंचक्रोशीतील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यशवंतनगर पंचक्रोशीतील आदाड, उसरोली, नांदगाव, मजगाव, वाळवटी, विहूर, सर्वे, भोईघर, आदी परिसरातील सुमारे शंभरहून अधिक एकर शेती पाण्याने वेढली आहे. पावसाचा जोर ओसरल्यावर नंतरच भात शेतीचे नुकसान आणि स्थिती समजून येणार आहे. या पावसाने नद्या नाले दुथडी भरून वाहून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी येथील सर्व खलाटी पाण्याखाली गेली असून भाताची रोपे पाण्यात पार बुडाल्याने ती कुजून गेल्यावर भात खाचरे ओसाड पडतील. अशावेळी पुनर्लागवडीसाठी रोपे आणायची कोठून, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.