पहिल्या वहिल्या विजेतेपदाला गवसणी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाचा कर्णधार निकोलस पूरनच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने अमेरिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या मेजर क्रिकेट लीगच्या विजेतेपदाला गवसणी घातली. निकोलस पूरनने 55 चेंडूत नाबाद 137 धावांची तुफानी खेळी केली. त्याने या खेळीत तब्बल 13 षटकार आणि 14 चौकार लगावले.
मेजर क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाने सिएटल ऑर्कास संघाचा सात गडी राखून पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. कर्णधार निकोलस पूरन याने नाबाद शतकी खेळी करीत विक्रम रचला आहे.
तत्पूर्वी, मुंबई न्यूयॉर्क संघाचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजासाठी उतरलेल्या सिएटल ऑर्कास संघाने सर्वबाद 183 धावा केल्या होत्या. यामध्ये क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 87 धावा केल्या. मुंबईकडून राशिद खान आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर मुंबईकडून एकट्या निकोलस पूरन याने 137 धावा केल्या, त्यासोबतच इमाद वसीम आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संघाचे मालक भारतीय वंशाचे
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिंस्को युनिकॉर्न, सिएटल ऑरकास, टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम या संघाचा समावेश आहे. या संघातील बहुतांश संघ मालक हे भारतीय वंशाचे आहेत. याचबरोबर आयपीएलमधील बऱ्याच फ्रंचायजींनी या लीगमधील संघदेखील खरेदी केले आहेत.