15 वर्षांच्या मुलाने टँकर चालवत अनेकांना दिली धडक
| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यात पुन्हा एक अपघात घडला असून त्यासाठीही एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे. पुण्यातील वानवडी येथे हा भीषण अपघात घडला आहे. अतशिय अवजड टँकर अवघ्या 15 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत काही मुले जखमी झाली असून एक दुचाकीवरील महिला देखील जखमी झाली आहे.
ही घटना शनिवारी (दि.29) सकाळी 6.30 च्या सुमारास घडल्याचे समजत आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सैफ पठाण असे या टँकर चालकाचे नाव असून तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकरही ताब्यात घेतला आहे. या टँकरचा मूळ मालक, महिंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहेत.
कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होते. तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपल्पवयीन मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.