आनंदाचा शिधा वाटपाची डोकेदुखी

। रायगड । प्रतिनिधी ।

गोरगरिबांना सण आनंदात साजरे करता यावेत, यासाठी तीन वर्षांपासून आनंदाचा शिधा ही योजना राज्य सरकारने राबवण्यास सुरुवात केली. मात्र, कधी वाहतूक कंत्राटदाराची दिरंगाई, तर कधी जिन्नस पोहचण्यात होणार्‍या विलंबाने लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा कधीही सणापूर्वी मिळालाच नाही. या एका योजनेमुळे पुरवठा विभागाच्या अन्य कामांवरही परिणाम होत असल्याने येणार्‍या दिवाळी सणासाठी आनंदाचा शिधा पाठवू नये, अशी विनंती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

‘आनंदाचा शिधा’च्या वाटपासाठी त्यातील समाविष्ट सर्व जिन्नस वेळेत दाखल होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानिमित्त जाहीर झालेल्या शिधाचे अद्याप वाटप पूर्ण झालेले नाही. लाभार्थ्यांकडूनही त्यास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने हा शिधा संपवायचा कसा, हा प्रश्‍न दुकानदारांना पडला आहे. दुकानदार तालुका पुरवठा अधिकार्‍यांना यास जबाबदार धरत असून शिल्लक शिधा परत न्या, असे सांगत आहेत. मात्र, पुरवठा अधिकारी शिल्लक राहिलेला शिधा परत नेण्यास असमर्थता दाखवत असल्याने कोणत्याही परिस्थितीत शिधामधील जिन्नस विकण्याचे काम दुकानदारांना करावे लागत आहे. साखर, रवा, गोडतेलाची पाकिटे खराब होत असल्याने दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने ही योजना सुरू केली, त्यापूर्वी रेशन दुकानदारांना नियमित धान्याचे वितरण, साडी वाटप, आधारकार्डला रेशनकार्ड संलग्न करणे, अशी कामे सर्व्हर डाऊन असतानाही करावी लागत होती. त्यातच शिधा वाटपाचे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. मात्र, यात दुकानदारांचे यात आर्थिक नुकसान होत आहे. शिधा वाटपाच्या कामाचा परिणाम रास्तभाव दुकानदारांच्या अन्य कामावरही होऊ लागल्याने दुकानदारही वैतागले आहेत. दर सणाला ही कटकट असल्याने येणार्‍या दिवाळीत आनंदाचा शिधा पाठवूच नये, असा तगादा दुकानदारही पुरवठा विभागाकडे करू लागले आहेत.

मागील वेळी शिध्यातील जिन्नस विकले न गेल्याने यंदाच्या गणेशोत्सवात 15 टक्के कमी मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यात लाभार्थी कार्डधारकांची एकूण संख्या चार लाख 63 हजार 610 इतकी असताना एकूण तीन लाख 96 हजार 991 इतक्याच लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा मंजूर करण्यात आला. तरीही जिल्ह्यातील दुकानांमध्ये रवा, चणाडाळ, गोडतेल अशा वस्तू शिल्लक आहेत. गणेशोत्सवानिमित्त रवा, चणाडाळ, गोडतेल, साखरेची 15 लाख 87 हजार पाकिटे मागवण्यात आली होती. आजच्या तारखेपर्यंत 97.18 टक्के जिन्नस दाखल झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील लाभार्थी संख्या
अंत्योदय शिधापत्रिका 83,504
अंत्योदय लाभार्थी - 2,57,313
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - 3,75,419
लाभार्थी 14,98,196.
एकूण शिधापत्रिका 4,58,923
एकूण लाभार्थी 17,55,509
15 हजार साड्या पडून
कमी उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना साडी वाटपाची योजना राज्य सरकारने सुरू केली होती. प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला एक साडी मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे हे काम थांबले होते. निवडणूक कार्यक्रम संपल्यावर पुन्हा वाटप सुरू झाले होते, परंतु रायगड जिल्ह्यात साडी वाटपाकडे लाभार्थ्यांनी अक्षरशः पाठ फिरवली असून आतापर्यंत 15 हजार साड्या तशाच पडून असल्याची माहिती पुरवठा शाखेकडून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाचा 97 टक्के शिधा आला आहे. त्याचे वाटप सुरू झाले असून त्यास काही वेळ लागणार आहे, असे असताना राज्य सरकारने दिवाळीसाठी आनंदाचा शिधा पाठवला नाही तर बरं होईल. कारण या एका कामामुळे पुरवठा विभागाच्या अन्य कामांवर परिणाम होत आहे. उशिरा शिधा येत असल्याने लाभार्थीदेखील तो विकत घेण्याकडे दुर्लक्ष करतात. आलेल्या वस्तू परत पाठवणे शक्य नसल्याने लाभार्थ्यांना वारंवार निरोप पाठवून शिधा घेऊन जाण्यास सांगावे लागते.

– सर्जेराव सोनवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड

Exit mobile version