नियमांचा उघडउघड खेळखंडोबा
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेतील बहुतांश अभियंते व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर तैनात आहेत. या कालावधीत कामांच्या दर्जावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने, शहर अभियंता विभागाने अधिकृत परिपत्रक काढून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व स्थापत्य व विकासकामांना स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत शहरात ठिकठिकाणी ठेकेदारांकडून कामे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर देखील विकासकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार केवळ नियमभंगापुरता मर्यादित नसून, तो प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकलेले ठेकेदारांचे धाडस दर्शवत आहे. आचारसंहिता लागू असताना मतदारांवर परिणाम होईल अशा कोणत्याही कामास मनाई असताना, ही कामे कोणाच्या परवानगीने किंवा आशीर्वादाने सुरू आहेत? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पालिकेच्या कामाबाबत आणखी गंभीर बाब म्हणजे, दर्जाहीन कामांबाबत तक्रार करणाऱ्या जागरूक नागरिकांना व सामाजिक संघटनांना धमकावले जात असल्याचे आरोप पुढे येत आहेत. व्हिडिओ पुरावे सादर करणाऱ्या तक्रारदारांवर ब्लॅकमेलिंग, खंडणीचे खोटे आरोप किंवा गुन्हे दाखल करण्याची भीती घालून दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार लोकशाही व्यवस्थेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करणारा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, लेखी आदेश असूनही कामे कशी सुरू? यामागे अभियंते आणि ठेकेदार यांच्यातील साटेलोट्याची शक्यता नाकारता येईल का? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई किंवा काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया राबवली जाणार का? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पालिकेच्या अभियंत्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर नवी मुंबई सजग नागरी सदस्यांना प्रत्यक्ष कामाला भेटी देत हस्तक्षेप करण्याची गरजच होणार नाही. ही बाब पालिका प्रशासनाने व ठेकेदारांनी लक्षात घ्यायला हवी, असे नवी मुंबई सजग नागरी मंचाने स्पष्ट केले आहे.
सजग नागरिक मंचाची भूमिका
सजग नागरिक मंचाने या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा इशारा दिला असून, कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना न जुमानता भ्रष्टाचार व नियमभंग उघड करण्याची भूमिका कायम ठेवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून सुरू असलेली कामे तात्काळ थांबवून, दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. भविष्यात अभियंत्यांच्या अनुपस्थितीत अशीच कामे सुरू राहिल्यास, या प्रकरणाची थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात येईल. तसेच, प्रामाणिकता, सचोटी आणि जनहिताप्रती असणारे उत्तरदायित्व यामुळे नवी मुंबईकर नागरिकांचा दृढ विश्वास सजग नागरिक मंच नवी मुंबईवर असल्याने निकृष्ट दर्जाच्या कामांवर पांघरूण घालण्यासाठी कुहेतूने मंचावर ब्लॅकमेल, खंडणीचे आरोप करण्याचे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही. खोट्या आरोपांना भीक न घालता सजग नागरिक मंच ‘संघर्ष नव्हे, संवाद’ या ब्रिदवाक्यानुसार आपली मार्गदर्शक व्यवस्थेसाठी चळवळ निरंतर चालू ठेवेल, असे मंचाकडून सांगण्यात आले आहे.







