स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक कोटींची बोली
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची धूळ खाली बसत नाही तोच राजकीय वर्तुळात ‘खोक्यांच्या’ चर्चेने खळबळ उडाली आहे. 15 जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी गोटाने स्पष्ट वर्चस्व मिळवले असले, तरी आता स्वीकृत नगरसेवक पदांवरून पैशांचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा आरोप सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेते रमेश गुडेकर यांनीच केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
गुडेकर यांच्या आरोपानुसार, स्वीकृत नगरसेवक पदासाठी ‘एक जागा, एक कोटी’ असा व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. निवडणुकीत पक्षासाठी झटलेल्या, कर्ज काढून प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांना डावलून, पैशाच्या जोरावर बाहेरचे धनदांडगे नगरसेवक बनण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला. “ज्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला, त्यांनाच संधी मिळाली पाहिजे; अन्यथा कार्यकर्त्यांचा विश्वास उडेल,” असा इशारा त्यांनी दिला.
या निवडणुकीत महाआघाडीच्या काही उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधारी गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तेव्हाही ‘घोडेबाजार’ झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता स्वीकृत पदांसाठी कोट्यवधींच्या बोली लागत असल्याच्या आरोपामुळे पनवेलमधील राजकारण पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
पनवेल महापालिकेत एकूण 78 नगरसेवकांपैकी 7 जागा स्वीकृत नगरसेवकांसाठी आहेत. त्यातील 5 जागा सत्ताधारी गटाला, तर 2 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. या जागांवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच केलेल्या या आरोपांमुळे पनवेलच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ‘लोकशाहीचा बाजार’ भरल्याची चर्चा आता नागरिकांत रंगू लागली आहे.
ज्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली, पक्ष टिकवला, त्यांनाच संधी मिळायला हवी. अन्यथा पक्षाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी होईल.
– रमेश गुडेकर, ज्येष्ठ नेते







