विनेश फोगटचा गंभीर आरोप
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कुस्तीपटू विनेश फोगटने आज गंभीर आरोप केला की, भारतीय कुस्ती महासंघ तिच्या सपोर्ट स्टाफला मान्यता पत्र न देऊन तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून रोखू इच्छित आहे. तर, फेडरेशनचा दावा आहे की, तिने अंतिम मुदतीनंतर अर्ज केला होता. विनेशने तिच्याविरुद्ध डोपिंगचे कट रचले जाण्याची भीतीही व्यक्त केली. 29 वर्षीय विनेशने 2019 आणि 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 53 किलोमध्ये कांस्यपदक आणि 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 किलोमध्ये सुवर्णपदक जिंकले. पुढील आठवड्यात किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणार्या आशियाई पात्रता स्पर्धेत तिला 50 किलोमध्ये ऑलिम्पिक कोटा गाठायचा आहे.
फिजिओला मान्यता पत्र जारी पतियाळा येथे झालेल्या निवड चाचणीतही तिने 53 किलो वजनी गटात भाग घेतला होता पण उपांत्य फेरीत तिचा पराभव झाला होता. भारतीय कुस्ती महासंघने सांगितले की प्रशिक्षक आणि फिजिओला मान्यता पत्र जारी करण्यासाठी विनेशचा ईमेल 18 मार्च रोजी प्राप्त झाला होता. परंतु, तोपर्यंत खेळाडू, प्रशिक्षक आणि वैद्यकीय कर्मचार्यांची यादी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला पाठविली गेली होती. नोंदणीची अंतिम तारीख 11 मार्च होती.
मला डोपमध्ये अडकवण्याचा कट विनेशने एका पोस्टमध्ये लिहिले की, ब्रिज भूषण आणि त्याचा डमी संजय सिंग मला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहेत. संघात नियुक्त केलेले प्रशिक्षक ब्रिजभूषण आणि त्यांच्या संघाचे सर्व आवडते आहेत, त्यामुळे माझ्या सामन्यादरम्यान ते माझ्या पाण्यात काहीतरी मिसळून मला प्यायला लावतील हे नाकारता येणार नाही. तसेच, मला डोपमध्ये अडकवण्याचा कट असू शकतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आमचा मानसिक छळ करण्यात कोणतीही कसर सोडली जात नाही. एवढ्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी आपल्यावर होणारा असा मानसिक छळ कितपत न्याय्य आहे?