दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

स्टार खेळाडूला न्यायालयाचे समन्स

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

सोशल मीडिया एन्फल्युएन्सर सपना गिल विनयभंग प्रकरणात सत्र न्यायालयाने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अंधेरीतील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर शॉ आणि अन्य सहकार्‍यांनी विनयभंग केल्याचा सपनाचा आरोप आहे. पृथ्वीला झालेल्या मारहाणीप्रकरणी सपनाला अटक झाली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटकाही झाली. सपनाने पृथ्वीसह त्याचा मित्र आशीष यादव आणि इतरांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तर शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्यावर बॅटने हल्ला केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

परंतु पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्याने सपनाने महानगरदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. तक्रारीची दखल घेऊन दंडाधिकार्‍यांनी 3 एप्रिल रोजी सांताक्रूझ पोलिसांना चौकशी करून 19 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु पोलिसांवर कारवाई करण्याची सपनाची मागणी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी मंगळवारी पृथ्वीसह विमानतळ पोलिसांनाही समन्स बजावले आहेत. गिलने आपल्या तक्रारीत भारतीय दंडाच्या कलम 354 (विनयभंग), 509 (शब्द, हावभाव किंवा हावभाव एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याच्या हेतूने) आणि 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे) अंतर्गत एफआयआर नोंदविण्याची मागणी केली.

दरम्यान, पृथ्वी शॉने सपनाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, तर दुसरीकडे सपना गिलने क्रिकेटपटूवर विनयभंगाचे आरोप केले होते. त्यामुळे प्रकरण आणखी वाढणार असं चित्र स्पष्ट झाले होते.

Exit mobile version