विश्वचषकाच्या ‘ड’ गटात मोठी उलथापालथ

| न्युयॉर्क | वृत्तसंस्था |

श्रीलंका-नेपाळ यांच्यामधील टी-20 विश्वकरंडकातील ‘ड’ गटातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. याचा फटका 2014 मध्ये टी-20 विश्वकरंडक पटकावणाऱ्या श्रीलंका संघाला बसला. याचसोबत नेपाळ संघाचेही नुकसान झाले. दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. श्रीलंका व नेपाळ या दोन्ही संघांना ‘सुपर आठ’ फेरीमध्ये पोहोचण्याची अंधुकशी आशा आहे; पण यासाठी ड गटातील पुढील लढतींचे निकाल त्यांच्या बाजूने लागण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या तरी श्रीलंका व नेपाळ हे संघ जर तरच्या समीकरणावर अवलंबून राहणार आहेत. दक्षिण आफ्रिका संघ ड गटामध्ये सलग तीन विजयांसह एकूण सहा गुण मिळवून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेश व नेदरलँड्‍स या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली आहे; पण सरस नेट रनरेटच्या जोरावर बांगलादेशचा संघ दुसऱ्या स्थानावर असून नेदरलँड्‍सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. नेपाळ व श्रीलंकन संघांनी प्रत्येकी एक गुणांची कमाई केली असून नेपाळचा संघ चौथ्या व श्रीलंकन संघ पाचव्या स्थानावर आहे.

श्रीलंका संघाला इतर लढतींच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेश-नेदरलँड्‍स यांच्यामधील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यास याचा फायदा श्रीलंकेला होणार आहे. श्रीलंकेला आगेकूच करता यावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेने नेपाळला हरवणे गरजेचे आहे. तसेच नेपाळने बांगलादेशवर विजय मिळवणेही आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकावगळता इतर सर्व संघांचे समान गुण झाल्यास ज्या संघाचा नेट रनरेट अधिक असेल त्या संघालाच घोडदौड करता येणार आहे.

Exit mobile version