विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्यातील अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांकरिता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवावा, अशी मागणी राज्यातील प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी केली आहे.
राज्यातील सर्व 29 महानगरपालिका, सर्व 247 नगर परिषदा, 147 पैकी 42 नगर पंचायती, 34 पैकी 32 जिल्हा परिषदा आणि 351 पैकी 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका नियत असून, या निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील अनेक स्थानिक प्रशासन कायद्यांतील तरतुदींनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता, विधान परिषद निवडणुकांकरिता तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रभागनिहाय विभागून वापरली जाते. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलैपर्यंत अद्ययावत केलेल्या महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांची मागणी केली आहे व त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या कार्यालयाच्या माध्यमातून या याद्या राज्य निवडणूक आयोगाला उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी राजकीय पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने 14 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेसचे नेत बाळासाहेब थोरात, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी सुभाष लांडे, भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अजित नवले व समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आदी शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी, विधानसभा निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांतील चुका दुरूस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांकरिता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
