महाराष्ट्राच्या कन्येची देदीप्यमान कामगिरी

। पोर्टलँड । वृत्तसंस्था ।

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावणारी संजीवनी जाधव हिने पोर्टलँडमधील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील महिलांच्या 10 हजार मीटर शर्यतीत पहिल्या क्रमांकावर झेप घेताना देदीप्यमान कामगिरी केली.

महाराष्ट्राच्या या कन्येने 32.22.77 सेकंद अशी वेळ देत ही शर्यत जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. ही तिची आतापर्यंतची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मागील वर्षी तिने या स्पर्धेत 32.46.88 सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत दुसरा क्रमांक पटकावला होता. यंदा तिने एक पाऊल आणखी पुढे टाकले. या शर्यतीत भारताची आणखी एक महिला खेळाडू सहभागी झाली होती. सीमा हिने ही शर्यत 32.55.91 सेकंद अशा वेळेसह पूर्ण करीत पाचवे स्थान पटकावले आहे. तर, भारताची तिसरी खेळाडू पारुल चौधरी हिने महिलांच्या स्टीपलचेस शर्यतीत तिसरे स्थान पटकावले. तिने 9.31.38 सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली. भारताच्याच प्रीती हिला मात्र निराशेला सामोरे जावे लागले. तिने 10.12.88 सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली. तिची 20व्या स्थानावर घसरण झाली.
महाराष्ट्राचा पुरुष अ‍ॅथलीट अविनाश साबळे याने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यत 8.21.85 सेकंद अशा वेळेसह पूर्ण केली आणि दुसरे स्थान मिळवले. अमेरिकेच्या केनेथ रुक्स याने 8.18.77 अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेचा विक्रम 8.18.55 सेकंद असा होता. केनेथ हा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात दूर झाला.

Exit mobile version