। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील ऐनवहाळ हद्दीत मंगळवारी (दि.23) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका बैलावर हल्ला केला असून, या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोहा तालुक्यातील ऐनवहाल, डोळवहाल, रेवेचीवाडी तसेच चिंचवली तर्फे अतोणे परिसरातील असंख्य गावे घनदाट जंगल भागात वसलेली आहेत. या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्यामुळे येथील जागृत नागरिकांनी वन विभाग, पोलीस अधिकारी, तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधला असून, हे तिन्ही पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बिबट्याची शोध मोहीम सुरु केली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या परिसरात बिबट्याने ऐनवहाल येथील पोलीस पाटील प्रकाश शांताराम मोरे यांचा अंदाजे 30 हजार रुपये किंमतीच्या बैलाचा बळी घेतला आहे. यामुळे या मार्गांवरून शाळेत जाणारे विद्यार्थी, कामगार, तसेच शेतावर जाणारे शेतकरी, तसेच मॉर्निंग वॉकला जाणारे जेष्ठ नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.






